सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा पेपर; 21 जूनच्या परीक्षेसाठी 'NTA'कडून वाढवला वेळ, रफ कामाची पानेही वाढवली
 DIGITAL PUNE NEWS

मोठी बातमी! NEET पुनर्परीक्षेचा कालावधी वाढला; आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा पेपर, NTA चा महत्त्वाचा निर्णय

डिजीटल पुणे    12-06-2026 14:44:12

नवी दिल्ली : पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेल्या NEET-UG 2026 च्या पुनर्परीक्षेसंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 21 जून रोजी होणाऱ्या या पुनर्परीक्षेसाठी परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांवरून 195 मिनिटे करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.15 या वेळेत होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत ही परीक्षा घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे NTA कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, विद्यार्थ्यांना रफ वर्कसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी प्रश्नपत्रिकेमध्ये रफ कामासाठी दोन पाने दिली जात होती. आता ही संख्या वाढवून चार पाने करण्यात आली आहे. त्यामुळे गणिती आणि विश्लेषणात्मक प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत.

पेपरफुटी प्रकरणामुळे 3 मे रोजी झालेली NEET परीक्षा रद्द करण्यात आली होती. राजस्थानमधील सीकर येथे परीक्षेपूर्वी 'गेस पेपर'चे वितरण झाल्याचा आरोप समोर आला होता. या गेस पेपरमधील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले होते. त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे. आधी केलेली नोंदणी वैध राहणार असून अतिरिक्त परीक्षा शुल्कही आकारले जाणार नाही. पुनर्परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्यात येणार असून त्याबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.

पेपरफुटीच्या घटनेमुळे आधीच मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्याचा निर्णय सकारात्मक पाऊल मानला जात आहे. मात्र, पुनर्परीक्षेमुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती