पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला आणि एका मित्राकडून झालेल्या सततच्या छळाला कंटाळून ४८ वर्षीय आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी नामांकित आयटी कंपनीतील दोन महिला कर्मचाऱ्यांसह एका व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित ब्राम्हे यांनी २ जून रोजी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या दोन पानी चिठ्ठीत काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. या चिठ्ठीत कंपनीतील वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्याकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सुसाईड नोटमध्ये चांगले प्रकल्प काढून घेणे, जाणीवपूर्वक कठीण कामे सोपवणे, इतर कर्मचाऱ्यांसमोर अपमानास्पद वागणूक देणे आणि नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकणे, अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, विनोद पाली या मित्राने खोट्या तक्रारी करून कंपनीत बदनामी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व घटनांमुळे मानसिकदृष्ट्या खचून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अमित यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी संबंधित तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील वाढता मानसिक तणाव, कार्यस्थळी होणारा कथित छळ आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.