सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
  • भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जणांचा मृ्त्यू; एअरक्राफ्टचे दोन तुकडे, आसाममधील घटनेनं देश हळहळला, चौकशीचे आदेश
  • पुणे वेधशाळेचा इशारा : 'एल निनो'चा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला
  • मोठी बातमी! 22 ते 24 जूनदरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन बंद; मंदिर प्रशासनाची महत्त्वाची सूचना
  • दुष्काळाचं संकट गडद? 'एल निनो' सक्रिय; महाराष्ट्रासह देशात कमी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
  • : यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
 विश्लेषण

दुष्काळाचं संकट गडद? 'एल निनो' सक्रिय; महाराष्ट्रासह देशात कमी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

डिजीटल पुणे    13-06-2026 12:20:09

नवी दिल्ली : प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय झाल्याने यंदाच्या मान्सूनबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागासह आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी दिलेल्या संकेतांनुसार, देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती वाढली आहे. महाराष्ट्रालाही याचा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर आलेल्या या इशाऱ्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. भात, कापूस, सोयाबीन, डाळी आणि तेलबिया यांसारख्या पिकांसाठी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाऊस आवश्यक असतो. मात्र, पावसात खंड पडल्यास पेरण्या उशिरा होण्याची किंवा दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता असून त्यामुळे उत्पादन खर्च वाढू शकतो.

हवामान अभ्यासकांच्या मते, एल निनो आणि दुष्काळ यांचा थेट संबंध नसला तरी २००२, २००९ आणि २०१५ या वर्षांतील कमी पावसाच्या घटनांमध्ये एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला होता. त्यामुळे यंदाच्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एल निनोमुळे पावसाचे वितरण असमतोल होण्याची शक्यता आहे. काही भागांत पावसाचे आगमन उशिरा होऊ शकते, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. याउलट, काही भागांना अल्पावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो. या बदलांचा सर्वाधिक परिणाम कृषी क्षेत्रावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांच्या माहितीनुसार, क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर (CPC) ने एल निनो सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. डिसेंबरपर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून १९५० नंतरचा हा सर्वाधिक प्रभावी एल निनो ठरू शकतो. त्याचा परिणाम मान्सूनच्या प्रगतीवर, पावसातील खंडांवर आणि एकूणच पर्जन्यमानावर होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, मेडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) या हवामान घटकाची स्थिती आणि अरबी देशांकडून येणारे कोरडे वारे यांमुळे मान्सूनच्या वाटचालीत अडथळे निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संपूर्ण पावसाळा एल निनोच्या प्रभावाखाली राहू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनीही संभाव्य परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पाऊस कमी झाल्यास शेतीबरोबरच धरणांतील जलसाठा, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही आठवड्यांतील मान्सूनची वाटचाल आणि एल निनोची तीव्रता याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती