आसाम : भारतीय हवाई दलाच्या एएन-32 मालवाहू विमानाला आसाममधील जोरहाट येथे भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत हवाई दलातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात सह-वैमानिकाचा जीव वाचला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (13 जून) जोरहाट जिल्ह्यातील रोरिया येथील हवाई दलाच्या तळावर 43 व्या स्क्वॉड्रनचे एएन-32 विमान लँडिंग करत असताना हा अपघात घडला. विमानात लष्करी साहित्य आणि अन्य मालवाहतूक सामग्री होती. दुर्घटनेनंतर विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्याला आग लागल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान अरुणाचल प्रदेशातून जोरहाटकडे येत होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य तत्काळ सुरू करण्यात आले.
दरम्यान, अपघातात बचावलेल्या सह-वैमानिकावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे.एएन-32 हे रशियन बनावटीचे दोन इंजिन असलेले टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट विमान असून, ईशान्य भारतातील दुर्गम भाग तसेच हिमालयीन सीमावर्ती प्रदेशांमध्ये लष्करी रसद पोहोचवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक दशकांपासून हे विमान भारतीय हवाई दलाच्या सेवेत आहे.
विशेष म्हणजे, एएन-32 विमानांशी संबंधित यापूर्वीही काही गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. 2019 मध्ये जोरहाटहून अरुणाचल प्रदेशातील मेचुकाकडे निघालेले एएन-32 विमान बेपत्ता झाले होते. त्यातील 13 जवानांचा मृत्यू झाला होता. त्याआधी 2016 मध्ये चेन्नईहून पोर्ट ब्लेअरकडे जाणारे आणखी एक एएन-32 विमान बंगालच्या उपसागरावर बेपत्ता झाले होते. त्या विमानातील 29 जणांना मृत घोषित करण्यात आले होते.या ताज्या दुर्घटनेनंतर एएन-32 विमानांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.