सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय
  • अमेरिका-इराण युद्ध थांबताच चित्र फिरलं, सोने-चांदी दरात मोठी वाढ
  • मेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या बातमीचा परिणाम आशियाई बाजारांमध्ये दिसून आला आहे. जपान आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजारांमध्ये तेजी सुरु आहे.
  • महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा वाढली; १८ जूननंतर मुसळधार पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम
 जिल्हा

तांदूळवाडी दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला; तीन माय-लेकरांसह आजीचा मृत्यू, एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार

डिजीटल पुणे    15-06-2026 12:50:22

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात रविवारी (१४ जून) घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत तीन माय-लेकरांसह एका आजीचा मृत्यू झाला असून एकूण आठ जणांनी आपला जीव गमावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहनामध्ये लहान मुलांसह १४ जण प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जीवाची पर्वा न करता केलेल्या प्रयत्नांत सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनेत पूजा अमोल साकोरे (२३) व तिचा आठ वर्षीय मुलगा आरव, पूजा बालाजी बावचे (२७) व तिचा सहा महिन्यांचा मुलगा समर्थ, अश्विनी संदीप बावचे (२७), तिची जुळी मुले संस्कार (१४) आणि संस्कृती (१४) तसेच इंदुबाई दशरथ बावचे (६०) यांचा मृत्यू झाला. एका कुटुंबातील अनेक सदस्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने बावचे आणि साकोरे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी रात्री उशिरा शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर येथील गोपाळपूर रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीत सर्व आठ जणांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सहा महिन्यांच्या चिमुकल्या बाळापासून ते १४ वर्षांच्या जुळ्या भावंडांपर्यंत निष्पाप जीव गमावल्याने अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नागरिकांनाही अश्रू अनावर झाले.

घटनेची माहिती मिळताच पंढरपूर आणि माळशिरस पोलीस, महसूल प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दल आणि क्रेनच्या मदतीने विहिरीतून प्रथम पिकअप वाहन बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बचाव पथकाने विहिरीत उतरून सर्व मृतदेह बाहेर काढले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत राज्य सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. नाशिक जिल्ह्यात यापूर्वी अशाच प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर रस्त्यालगतच्या उघड्या विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांना कठडे उभारणे किंवा विहिरी बुजविण्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय जाहीर केला होता. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

"सरकारने केलेल्या घोषणांची वेळेत अंमलबजावणी झाली असती, तर अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता आल्या असत्या. या आठ जणांच्या मृत्यूसाठी सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे," अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे.तांदूळवाडी येथील या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असून रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती