जयपूर : राजस्थानमधील जयपूर येथे पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी दीपके यांना कानशिलात लगावल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक शहीद स्मारक येथे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करत होते. यावेळी घोषणाबाजीदरम्यान काही तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. दीपके यांना समर्थकांनी खांद्यावर उचलून नेत असताना दोन तरुणांनी त्यांच्यापर्यंत पोहोचत कानशिलात मारली.
या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणांना पकडून मारहाण केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत हल्ला करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान काही आंदोलकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याच्याही तक्रारी समोर आल्या, त्यामुळे व्यासपीठावरून नागरिकांना आपले साहित्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
हल्ल्यानंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलकांना संबोधित करत समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाला विरोध करण्याचे आवाहन केले. तसेच, २० जून रोजी पुन्हा दिल्लीकडे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. "राजीनामा मिळेपर्यंत लढा सुरू राहील," असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली.