सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन; 'ऑपरेशन टायगर'नंतर पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे आमनेसामने, शक्तिप्रदर्शनाकडे राज्याचे लक्ष
  • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोने 4 हजारांनी तर चांदी तब्बल 18 हजार रुपयांनी स्वस्त
  • तुळजापूरमध्ये 200 आणि 500 रुपये भरून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांचं स्वतंत्र दर्शन बंद; सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शन
 DIGITAL PUNE NEWS

‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा तापली; ओमराजे निंबाळकर दिल्लीत गेल्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

डिजीटल पुणे    17-06-2026 12:08:10

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) कथित ‘ऑपरेशन टायगर’ला नवे वळण मिळाले आहे. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मंगळवारी मध्यरात्रीनंतर खाजगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याचा दावा काही सूत्रांकडून करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना आणखी बळ मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने दोन खाजगी विमाने सज्ज ठेवण्यात आली होती. ओमराजे निंबाळकर आणि काही अन्य नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे उड्डाणाच्या वेळेत दिवसभरात अनेकदा बदल करण्यात आल्याचीही चर्चा आहे. सुरुवातीला दुपारी, त्यानंतर सायंकाळी आणि रात्री उड्डाणाचे नियोजन करण्यात आले होते. अखेर रात्री १ वाजण्याच्या सुमारास विमानाने दिल्लीकडे झेप घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

या विमानात माजी मंत्री तानाजी सावंत तसेच जयराजे निंबाळकर हे देखील असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना आपण पुण्यातच असल्याचे सांगितले होते. त्यांच्या मुलाच्या प्रकृतीसंदर्भातील उपचार आणि वडील पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते कुटुंबासह पुण्यात असल्याची माहितीही समोर आली होती. त्यामुळे ते प्रत्यक्षात पुण्यात आहेत की दिल्लीत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथील त्यांच्या निवासस्थानीही विशेष हालचाल दिसून आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. घरातील दैनंदिन वापरातील वाहनेही पार्किंगमध्ये असल्याने संभ्रम अधिक वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या कथित दिल्ली दौऱ्याने राजकीय वातावरण आणखी तापले असून पुढील काही तासांत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती