पुणे : पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. केडगाव चौफुला येथील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भलिंग तपासणीत गर्भात मुलगी असल्याचे आढळल्यानंतर संबंधित महिलांना बेकायदेशीर गर्भपातासाठी ‘पार्थ हॉस्पिटल’मध्ये पाठवले जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी हा स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करत गावोगावी फिरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गर्भलिंग निदान करत होता. विशेष म्हणजे, पशुधनाच्या आरोग्य तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सोनोग्राफी मशीनचा वापर महिलांच्या गर्भलिंग तपासणीसाठी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, या रॅकेटचे जाळे पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांपर्यंत पसरले होते. गरोदर महिलांचा शोध घेऊन त्यांची बेकायदेशीर तपासणी केली जात होती. त्यानंतर गर्भात मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यास पुढील प्रक्रियेसाठी त्यांना विशिष्ट रुग्णालयांमध्ये पाठवले जात होते.
या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य सूत्रधार अण्णासाहेब गिरी, त्याचा सहकारी नरेंद्र साहेबराव ठाकरे, डॉ. अतुल अंकुश जाधव आणि डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड यांचा समावेश आहे.या रॅकेटमागील आर्थिक व्यवहार, त्यातील इतर संबंधित व्यक्ती तसेच आणखी कोणती रुग्णालये किंवा डॉक्टर या साखळीत सहभागी होते का, याचा सखोल तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.