पुणे : राज्यातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि इतर बंदी घातलेल्या अन्नपदार्थांच्या विक्री-वितरणाविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर एकाच वेळी करण्यात आलेल्या धडक कारवाईत 21 आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत तब्बल 7 लाख 43 हजार 117 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून 17 जणांना अटक करण्यात आली आहे.
एफडीएच्या पथकांनी विविध जिल्ह्यांतील 21 आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी 16 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळून आला. या प्रकरणांमध्ये राज्यभरात 12 एफआयआर नोंदवण्यात आले असून 7 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. तसेच अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कारवाईमध्ये बृहन्मुंबई विभाग आघाडीवर राहिला. येथे 13 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून 8 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले. या भागात 1 लाख 417 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आली. तसेच 5 आस्थापना सील करण्यात आल्या.
कोकण विभागात एका आस्थापनेवर कारवाई करत 1 लाख 32 हजार 970 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पुणे विभागात एका ठिकाणी छापा टाकून 2 हजार 565 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली. तसेच संबंधित आस्थापना सील करण्यात आली.
नाशिक विभागात 1 लाख 64 हजार 434 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून एक वाहनही जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर विभागात दोन आस्थापनांवर कारवाई करत 1 लाख 24 हजार 80 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. येथे तीन आरोपींना अटक झाली असून एक आस्थापना आणि एक वाहन जप्त करण्यात आले.
नागपूर विभागात 1 लाख 91 हजार 445 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तर अमरावती विभागात दोन आस्थापनांवर कारवाई करून 27 हजार 206 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि दोन जणांना अटक करण्यात आली.
एफडीएने स्पष्ट केले आहे की, राज्यातील प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधातील मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.