सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष
  • : मोठी बातमी : ओमराजे केस हरताच एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, अमित शाहांसोबत चर्चा, आता वरिष्ठ न्यायालयात जाणार!
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 विश्लेषण

निम्मा जून संपला तरी मान्सूनची प्रतीक्षा; 24 जूननंतर कोकण-मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

डिजीटल पुणे    18-06-2026 16:34:03

पुणे : जून महिना अर्धा उलटून गेला असतानाही महाराष्ट्रातील बहुतांश भाग अद्याप मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये उकाडा आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले असून, पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 22 ते 24 जूनदरम्यान वातावरण अनुकूल झाल्यास मान्सूनला पुन्हा गती मिळू शकते.

यंदा मान्सूनचे केरळमध्ये आगमन उशिराने झाले. त्यानंतर 6 जून रोजी तो तळकोकणात दाखल झाला, तर 8 जूनला हर्णे आणि सोलापूर परिसरापर्यंत त्याची प्रगती झाली. मात्र, त्यानंतर मान्सूनची वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे आणि पश्चिमी जेट स्ट्रीमच्या बदललेल्या स्थितीमुळे मान्सूनला पोषक वारे मिळत नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या पंजाब ते बिहारपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, पूर्व उत्तर प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीपर्यंतही कमी दाबाची स्थिती कायम आहे. पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगड परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 25 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, 18 जून रोजी पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

19 जून रोजीही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज असून, रायगड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती