पुणे : लग्नाच्या तयारीला वेग आला होता. जयपूरमध्ये तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता, तर पाहुण्यांसाठी दोन विशेष विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांपूर्वीच एका दुर्दैवी अपघाताने सर्व आनंदावर विरजण पडले. लोहगड किल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरून 24 वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (18 जून) केतन आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेला होता. दोघेही सकाळी ट्रेकिंगसाठी किल्ल्यावर पोहोचले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने आठवणी जपण्यासाठी ते फोटो आणि व्हिडिओ काढत होते.
दरम्यान, किल्ल्यावरील दरीलगतच्या भागात उभे राहून फोटो काढत असताना केतनचा अचानक तोल गेला. पावसामुळे परिसर निसरडा झाल्याने त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. ही घटना पाहून त्याच्या होणाऱ्या पत्नीने मदतीसाठी आर्त हाक दिली.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस, शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने दरीत उतरून केतनला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र, गंभीर दुखापतींमुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, केतन आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचा विवाह येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होता. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. जयपूर येथे भव्य विवाहसोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, एका क्षणातील दुर्घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर पावसाळ्यात किल्ले आणि पर्यटनस्थळी सेल्फी किंवा फोटो काढताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.