तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने भाविकांच्या दर्शन व्यवस्थेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे 200 आणि 500 रुपये शुल्क भरून मिळणाऱ्या व्हीआयपी किंवा सशुल्क दर्शनासाठीच्या स्वतंत्र मार्गांची व्यवस्था बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व भाविकांना आता एकाच रांगेतून आणि समान अंतरावरून देवीचे दर्शन घेता येणार आहे.
यापूर्वी सशुल्क पासधारकांना देवीचे जवळून दर्शन मिळत असल्याने सर्वसामान्य भाविकांना दीर्घकाळ रांगेत थांबावे लागत होते. अनेकदा दर्शन व्यवस्थेवरून नाराजीही व्यक्त केली जात होती. नव्या निर्णयानंतर कोणत्याही भाविकाला विशेष प्राधान्य दिले जाणार नसून सर्वांसाठी एकसमान दर्शन व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले की, देणगी किंवा सशुल्क दर्शनाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, दर्शनासाठी असलेले स्वतंत्र मार्ग बंद करण्यात आले असून सर्व भाविकांना समान पद्धतीने दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या निर्णयामुळे दर्शन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, तसेच भाविकांना अधिक सुलभ आणि शिस्तबद्ध पद्धतीने तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येईल, असा विश्वास मंदिर संस्थानकडून व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयाचे अनेक भाविकांकडून स्वागत केले जात आहे.