पुणे : सिंहगड रोडवरील अभिरुची मॉल येथे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २’ च्या विशेष मोफत शोचे आयोजन करण्यात आले. सामाजिक वास्तव, शेतकऱ्यांच्या समस्या आणि वाढत्या आत्महत्यांच्या प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या आशयघन चित्रपटाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या विशेष शोचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते प्रवीण तरडे यांनी उपस्थित राहून प्रेक्षकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.कार्यक्रमावेळी नगरसेवक किरण दगडे पाटील, किरण कुमावत, दीपक जी. नागपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘देऊळ बंद २’ हा चित्रपट शेतकऱ्यांच्या समस्या, समाजातील विविध वास्तववादी प्रश्न तसेच श्रद्धा-अंधश्रद्धा, विज्ञान आणि अध्यात्म यांतील संतुलित दृष्टिकोन प्रभावीपणे मांडतो. मराठी मातीशी नाळ जपणारा आणि विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
यावेळी उपस्थितांनी चित्रपटाचे कौतुक करत अशा सामाजिक आशयाच्या चित्रपटांचे अधिकाधिक विशेष शो आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अभिरुची मॉलमध्ये झालेल्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला दर्जेदार मराठी चित्रपटाचा आनंद घेण्याची संधी मिळाली.
