सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष
  • : मोठी बातमी : ओमराजे केस हरताच एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, अमित शाहांसोबत चर्चा, आता वरिष्ठ न्यायालयात जाणार!
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 DIGITAL PUNE NEWS

पवनराजे प्रकरणाला नवं वळण; निकालानंतर एकनाथ शिंदेंनी अमित शाहांशी साधला संपर्क, CBI जाणार वरिष्ठ न्यायालयात

डिजीटल पुणे    20-06-2026 15:12:54

मुंबई : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा कायदेशीर धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रकरणाचा सखोल अभ्यास करून आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, संपूर्ण खटला ज्या माफीच्या साक्षीदाराच्या जबाबावर उभा होता, त्याची साक्ष विसंगत, संशयास्पद आणि अविश्वसनीय आढळली. त्यामुळे आरोपींविरोधातील आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात तपास यंत्रणांना अपयश आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तपासातील गंभीर त्रुटींवरही न्यायालयाने ताशेरे ओढले. आरोपींचे मोबाईल फोन जप्त न करणे, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) गोळा न करणे आणि आरोपींमधील कथित संपर्काचे ठोस पुरावे सादर न करणे या बाबी तपासातील मोठ्या उणिवा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या त्रुटींमुळे कटकारस्थान सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा दुवा हरवल्याचेही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

३ जून २००६ रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कळंबोलीजवळ पवनराजे निंबाळकर यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात २५ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर ठेवण्यात आला होता.तब्बल २० वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आलेल्या या निकालाने प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, CBI वरिष्ठ न्यायालयात अपील केल्यानंतर पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती