कर्नाटक : भारताच्या संस्कृतीमध्ये वीरशैव धर्म व तत्त्वज्ञानाची परंपरा ही एक प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार हिमालयातील केदारनाथ, कर्नाटकातील रंभापुरी, आंध्रातील श्रीशैल्यम, मध्यप्रदेशातील उज्जैन आणि उत्तर प्रदेशातील काशी या पाच ठिकाणी पाच पीठ स्थापित करून पाच आचार्यांनी या धर्म व तत्वज्ञानाच्या परंपरेचा प्रचार, प्रसार आणि विस्तार केला.
या प्रत्येक पिठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाखा मठांची स्थापना करून वीरशैव धर्म व तत्वज्ञान सामान्य जणांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य मागच्या हजारो वर्षापासून होत आले आहे. अशा या सर्व मठ आणि मठांच्या ठिकाणी असलेल्या सर्व शिवाचार्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य या पाच पिठाद्वारे होत असतं.
प्रामुख्याने परमार्थिक किंवा आध्यात्मिक जीवनाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी हे पाच पीठ मार्गदर्शन करीत असतात. व्यवहारी दृष्टिकोनातून या पाच पिठावर विराजमान असलेले जगद्गुरु हे कधीही एकत्र येत नाहीत. मात्र जेव्हा जेव्हा धर्माच्या विशिष्ट कार्याला मूर्त रूप द्यायचे असते तेव्हा हे पाचही जगद्गुरु एकत्र येतात. त्याच अनुषंगाने दिनांक 21 आणि 22 जुलै 2025 रोजी कर्नाटक राज्यातील दावणगेरे या गावी आयोजित करण्यात आलेल्या शिवाचार्य शिखर सम्मेलन प्रसंगी श्रीमद पाच जगद्गुरुंचे एकत्र दर्शन झाले. निश्चितच ह्या प्रसंगाची नोंद इतिहासात होणारी आहे.
श्री गुरूवे नमः ll
प्रा. डॉ. वेदप्रकाश डोणगावकर (मठवाले)
वाशिम