मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनावरून राजकारण तापले आहे. आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणावर ठाम असतानाच भाजप आमदार संजय केणेकर यांनी धक्कादायक आरोप केला आहे. "मनोज जरांगे हे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असून त्यांचा वापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करण्यासाठी केला जात आहे," असे त्यांनी म्हटले. याशिवाय, "पवारांनी राज्यात दंगली घडवल्या, जातीभेद वाढवला आणि अराजकता निर्माण केली," असे गंभीर आरोपही त्यांनी केले. या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे भाजप आमदार संजय केणेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना एक स्फोटक विधान केलं आहे. मनोज जरांगे पाटील हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब आहे, शरद पवार हे मनोज जरांगेंचा वापर करत आहेत. शरद पवारांनी सुसाईड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषापायी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे असं म्हणत संजय केणेकर यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय केणेकर यांनी म्हंटल कि, शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे बघितले जाते. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगे सारखे सूसाईड बॉम्ब तयार करतात आणि त्याचा वापर करतात हे राज्याचं दुर्देवं आहे. शरद पवारांनी जरांगे हा सुसाईड बॉम्ब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकण्यासाठी तयार केला आहे. पवारांची कारकीर्द पाहिली तसेच यापूर्वीचा इतिहास बघितला तर तो असाच राहिला आहे. पवारांनी कोणालाच मुख्यमंत्री पदावर कायमचं बसू दिलेलं नाही. परंतु जरांगे पाटील यांच्यामुळे समाजाचे नुकसानच होत आहे असं संजय केणेकर यांनी म्हंटल.
जरांगे पाटील यांच्या मागण्या काय ?
1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.