"व्यवस्थापन ताणतणावाचे"
"घर- संसाराची जबाबदारी,
स्वप्न उराशी जागवणारी,
स्वतःसाठी वेळ निघेना,
तरीही सगळे सांभाळणारी,
स्त्री आहे ती, तीच शक्ती आहे,
तिच्या जिद्दी वरच जग उभे आहे, पण कधी थांबून तिला विचारा,
तु काही वेळ स्वतः साठी दे!"
स्त्रिया त्यांच्या आयुष्यात विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात. घरातील जबाबदाऱ्या नोकरी, समाजाच्या अपेक्षा आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधताना त्यांना अनेक प्रकारच्या तणावांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
स्त्रिया समाजाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक क्षेत्रात आपले योगदान देत असतात. त्यातीलच एक जबाबदारी म्हणजे आर्थिक जबाबदारी. महिलांना आर्थिक स्वायत्ता मिळवताना अनेक अड्चणींचा सामना करावा लागतो. घरकर्ज, कर्जफेड, बचत यांचा ताण त्यांना जाणवतो, यासाठी महिलांनी आर्थिक नियोजन करणे, बचतीच्या सवयी लावणे, तसेच आर्थिक साक्षरता वाढवणे गरजेचे आहे.
स्त्रीच्या आयुष्यामध्ये सामाजिक जबाबदारी सुध्दा महत्त्वाची आहे. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करताना महिलांवर मोठ्या प्रमाणात दबाव असतो. स्त्रियांनी स्वतःच्या ओळखीला महत्त्व दयावे, आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा. तसेच समाजाच्या चुकीच्या कल्पनांना विरोध करावा.
स्त्रिच्या आयुष्यात शिक्षण घेत असताना किंवा नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करताना तणावाचा सामना करावा लागतो. स्पर्धात्मक वातावरण, करिअरमध्ये प्रगतीची चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे तणाव वाढतो. योग्य वेळेचे व्यवस्थापन,सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा तणाव कमी करता येतो.
कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना, महिलांना मोठा मानसिक तणाव जाणवतो. घरातील जबाबदाऱ्या वाटून घेणे, संवाद साधणे, स्वतःसाठी वेळ काढणे हे तणाव व्यवस्थापनाचे उपायच आहेत. थोडक्यात, महिलांनी स्वतःच्या मानसिक आणि शारिरिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तणाव टाळण्यासाठी योग्य वेळेचे नियोजन, ध्यानधारणा, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मनिर्भरता महत्त्वाची आहे.
समाजानेही महिलांना समजून घेतले पाहिजे. त्यामुळे महिलांचे जीवन अधिक आनंददायी आणि सुखकर होईल. तसेच महिलांनी आपले जर आपले शरीर व मन यांची योग्य काळजी घेतली तरएक आनंदी आणि तणावमुक्त महिला संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाचे कारण बनते.महिलांनी जर ताण तणावाचे व्यवस्थापन केले तर उच्च रक्तदाब मधुमेह, हृदयविकार, यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. तसेच चिडचिड, राग व नकारात्मकता कमी होते. कुटुंबातील लोकांशी चांगले संबंध राहतात. पालकत्व व दांपत्य जीवन अधिक समजूतदार होते. छंद जोपासणे व त्यासाठी वेळ देणे हेही ताणतणावातील व्यवस्थापनातील एक कारण होऊ शकते.
शेवटी, मला असे म्हणावेसे वाटते की प्रत्येक महिलेने आयुष्याचा आनंद घेणे. कारण; ही संधी आपल्याला आयुष्यात मिळत नसते तर ती शोधायचे असते.
" तणावमुक्त स्त्री म्हणजे कुटुंबाच्या आणि समाजाच्या, सुख-समृध्दीचा आधारस्तंभ !
सौ कृतिका जयवंत जंगम
पत्ता- नऱ्हे मानाजीनगर, पुणे 41
ई-मेल[email protected]
