मुंबई : चंद्रकांत धोत्रे वय ६१ रा.सोलापूर यांचा मुंबईतील आमदार निवास येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांना त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यासाठी अर्धा पाऊण तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, त्यामुळे त्यांना पोलिसांच्या वाहनातून दवाखान्यात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णवाहिका वेळेत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचविता आला असता अशी माहिती धोत्रे यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. ते सोलापूर येथील आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते होते. काही कामानिमित्त त्यांना मुंबई येथे जावे लागले होते. वेळेत रुग्णवाहिका का उपलब्ध झाली नाही याबाबत चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजनेसाठी सभापती यांचेशी पत्रव्यवहार करत असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.