पुण्यामध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 92 युवकांना नियुक्ती पत्रे प्रदान
केंद्रीय मंत्री जयप्रकाश नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती
Posted On: 26 APR 2025 4:10PM by PIB Mumbai
पुणे, 26 एप्रिल 2025
आज 15व्या रोजगार मेळाव्यामध्ये देशातील 51 हजाराहून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून नियुक्ती पत्र देण्यात आली. पुण्यात ‘यशदा’ येथे केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालय, पुणे- 1 यांच्यातर्फे या रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायने व खते मंत्री जयप्रकाश नड्डा, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
तसेच केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालय, पुणे- 1 चे प्रमुख आयुक्त मयंक कुमार व प्रधान आयुक्त मिहीर कुमार हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी सर्वांना संबोधित केले. “जेव्हा युवा राष्ट्र उभारणीत सहभागी होतात तेव्हा राष्ट्राचा विकास वेगाने होतो, जगातही तो आपला ठसा उमटवतो. आज, भारतातील तरुण आपल्या कठोर परिश्रम, नवोपक्रमाद्वारे जगाला आपली क्षमता दाखवत आहेत.”, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काढले.

“सरकारने विविध मंत्रालय, विभागांना कालबद्ध रीतीने कार्यालयातील रिकाम्या जागा भरण्यासाठी प्रेरित केले, ज्यामुळे सातत्याने पदे भरली जात आहेत.”, असे केंद्रीय मंत्री नड्डा यांनी नमूद केले. पुढे बोलताना नवनियुक्त कर्मचाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, “सरकारी नोकरीकडे नागरिकांची सेवा करण्याची जबाबदारी या दृष्टीकोनातून पहा.”

“युवकांना केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या ज्यातून तरुणांना सक्षम केले जात आहे. 10वर्षात देशामध्ये विविध क्षेत्रात सुमारे 17 कोटी 19 लाख नोकरीच्या संधी तयार झाल्या.”, अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यानिमित्ताने दिली.

आज वस्तू व सेवा कर आयुक्तालय, भारतीय रेल्वे, बँका, आरोग्य मंत्रालय, आयकर विभाग, विविध बँका, CRPF, EPFO, BRO, Defense Estate, FCI, CGHS अशा विविध विभागातील सुमारे दोनशे नव्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 92 नव नियुक्त कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

ज्यामध्ये दृष्टी बाधित महिला कर्मचारी व्हॅलेंटिना विनायक कांडलकर व दिव्यांग श्रेयांश शर्मा यांचा देखील समावेश होता.
याप्रसंगी पहलगाम येथील दुःखद घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
***