पुणे : वैकुंठ स्मशानभूमीत परिचितांच्या दशक्रिया विधी साठी गेलो असता एक अत्यंत अस्वस्थ करणारे दृश्य बघावयास मिळाले.दहाव्या च्या वेळी मयत व्यक्ती चे नातेवाईक विधी केल्यानंतर पिंडदान करतात व त्या व्यक्तीस प्रिय असे खाद्य पदार्थ तेथे ठेवले जातात. येथे पिंडीला काकस्पर्श झाल्यास मयत व्यक्ती ने अथवा पितृपक्षात पूर्वजांनी अन्नाचे ग्रहण केले असे मानले जाते.कावळा हा पूर्वजांचे प्रतीक मानला जातो.
मात्र मानवी जीवनात सर्वत्र अतिक्रमण केलेल्या कबुतरांच्या झुंडी या ठिकाणी दिसून आल्या व ज्याप्रमाणे विविध सोसायटीत किंवा सार्वजनिक ठिकाणी कबुतरांनी उच्छाद मांडलाय व त्यांनी चिमणी सारखे पक्षी हुसकावून लावलेत त्याचप्रमाणे येथे ही त्यांनी झुंडीने आक्रमण केले असून कावळ्याच्या हक्कावर अतिक्रमण केल्याचे दिसून येते.येथे कावळ्यांना हुसकावून कबुतर पिंडासह खाद्य पदार्थावर ताव मारताना दिसून आले.
ज्याप्रमाणे पुणे मनपाने पुढाकार घेऊन कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई चे आदेश दिलेत त्याच धर्तीवर आता वनविभाग व पक्षी तज्ञ यांच्याशी चर्चा करून कबुतरांच्या कलिंग बाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करत आहे.
"कलिंग" म्हणजे जनावरांच्या एखाद्या कळपातील तो कळप फार मोठा होऊ नये म्हणून काही जनावरे मारणे.कबुतर हा संरक्षित पक्षी / प्राणी नसल्याने याबाबत गांभीर्याने विचार करावा अन्यथा नजिकच्या काळात सर्वत्र कबुतरांचा उच्छाद दिसून येईल.