पुणे: भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मॉक ड्रील करण्याचा आदेश दिला आहे. युद्ध स्थितीचा कसा सामना करायचा त्यासाठी हे मॉक ड्रील असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, उद्या 7 मे रोजी हे मॉक ड्रील होणार आहे. शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा, ते ट्रेनिंग या दरम्यान नागरिकांना दिलं जाईल. सिविल डिफेंस म्हणजे नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉक ड्रीलमागे उद्देश आहे. यास सहकार्य करण्याचे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, नागरी संरक्षण यंत्रणा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या म्हणजेच ७ मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या महाराष्ट्रात तसेच पुण्यातही हे मॉक ड्रिल होणार आहे. हवाई हल्ल्यादरम्यान इशारा देणारे सायरन कार्यान्वित करणे, हल्ला झाल्यास नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना स्व संरक्षणाचे प्रशिक्षण देणे, आपत्कालीन स्थितीत क्रॅश ब्लॅक आउट अमलात आणणे, आपत्कालीन स्थितीत मदतकार्य अद्ययावत करणे आणि त्याचा सराव करणे आदी या मॉक ड्रिलचा महत्वाचा भाग असणार आहे. देशातलत्या सर्व नागरिकांनी यात सहभाग घ्या. सहकार्य करा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. तुमचा सहभाग आणि तुमच्या सकारात्मकतेने नक्की बदल घडेल, असेही पाटील यांनी म्हटले.
प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. ही मॉक ड्रिल पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.