पाकिस्तान : भारताने जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताच्या या हल्लयात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारल्याचे बोललं जातंय. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरला असून पाक नेत्यांकडून भारताला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. त्यातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना अत्यंत कठोर विधान केलं. काल रात्री केलेल्या चुकीची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल, आम्ही रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार अशी धमकीच शाहबाज शरीफ यांनी भारताला दिली आहे.
भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ऍक्शन मोड मध्ये आलेत. काल मध्यरात्री त्यांनी पाकिस्तानच्या जनतेला संभोधित करत भारताला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी मृतांचा उल्लेख ‘शहीद’ असा करत संपूर्ण पाकिस्तान त्या शहिदांसोबत उभा असल्याचं म्हटलं. शाहबाज शरीफ म्हणाले, काल रात्री घडलेल्या घटनेबद्दल क्षणाक्षणाचे अपडेट्स मला मिळत होते. काल रात्री भारताने संपूर्ण तयारी करत 80 फायटर जेट्ससह पाकिस्तानमधील ६ ठिकाणांवर हल्ले केले. भारताने रात्रीच्या अंधारात आमच्यावर हल्ला केला. परंतु अल्लाहच्या कृपेने आमचं सैन्य त्यांना चोख उत्तर देऊ शकलं. या हल्ल्यात अनेक नागरिकांसह लहान मुलांचा मृत्यू झाला. अल्लाह त्यांना स्वर्गात जागा देवो
भारताला मोठी किंमत मोजावी लागणार- शाहबाज शरीफ
शाहबाज शरीफ पुढे म्हणाले, भारताला या कारवाईचे परिणाम भोगावे लागतील, आदल्या रात्री जी चूक केली त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल. आम्ही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल असे म्हणत पाकिस्तानने भारताला काही तासाताच प्रत्युत्तर देत बॅकफूटवर ढकलल्याचा दावाही शरीफ यांनी केला. आम्ही काल रात्री सिद्ध केलं की पाकिस्तानला कडक उत्तर कसं द्यायचं हे माहीत आहे.असं सांगत शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याला सलाम सुद्धा केला. पाकिस्तानी लष्कराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आम्हाला अभिमान असल्याचं शहबाज शरीफ यांनी म्हटलं.