बार्शी : अंबऋषी राजा हा श्री महाविष्णू भगवंताचा परमभक्त होता. त्याने पूर्वीचे पंकापूर, पंकतीर्थ, पुष्पावती नदीकाठी असलेल्या शांत ठिकाणी तपश्चर्येसाठी वास्तव्य केले. द्वादशीचे व्रत केले, दशमीच्या दिवशी एकभुक्त, एकदशी दिवशी निर्जल, द्वादशी दिवशी व्रताचे पारणे हा त्याचा नित्यक्रम होता. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी इंद्राच्या विनंतीनुसार दुर्वास ऋषी हे मुद्दामहून द्वादशीच्या दिवशी बार्शीला आले. त्यांनी अंबऋषी राजाने अपमान केला असल्याचे सांगत कुसपट काढून क्रोधित होऊन, पुष्पवती नदीला पालथे होण्याचा व दहा जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. आजही बार्शीतील नदी जमिनीच्या खालून भूगर्भातून वाहते आहे.
भक्त अंबऋषी राजाने आपले आराध्य दैवत श्री भगवंताचा धावा केला. भगवंताने आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी प्रकट होऊन दुर्वासाच्या मागे आपले सुदर्शन चक्र सोडले. चुकीचे वागल्याने मोठे संकट मागे लागले याची जाणीव झालेले दुर्वास ऋषी यांना पळता भुई थोडी झाली. पळून पळून शेवटी त्यांनी श्री महादेव शंकराचा धावा केला. भक्ताच्या हाकेला धावून श्री शंकरांनी सुदर्शन चक्र शांत केले व त्यांनी आश्रयास आलेल्या दुर्वासला जीवदान दिले. परंतु साधू संतांच्या मुखातून पडलेल्या शब्दाला खरे होण्यासाठी स्वतः श्री भगवंतांनी दहा जन्म सोसण्याचे मान्य केले. भक्तासाठी स्वतः श्रीविष्णू भगवंतांनी आतापर्यंत मत्स्य, कुर्म, वराह, श्रीराम, श्रीकृष्ण, वामन, नृसिंह, परशुराम, बुद्ध असे नऊ जन्म भोगले आहेत, तर कल्की हा आणखी एक अवतार होणे बाकी आहे.