मुंबई : भारत-पाकिस्तान सीमेवरील ताण वाढला आहे. पाकिस्तानकडून भारतातील विविध शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई-पुण्यातही हल्ल्याचा धोका वाढला आहे. खासकरुन मुंबईवर सागरी मार्गाने हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे भारतीय नौदलाने मुंबईतील मच्छिमारांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. 26/11 च्या हल्ल्याप्रमाणे दहशतवादी कारवायांसाठी मासेमारी नौकांचा गैरवापर होऊ शकतो. या भीतीमुळे किनारपट्टीवरील दक्षता वाढवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर मच्छिमारांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नौदलाकडून मुंबईतील मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
नौदल अधिकाऱ्यांनी बैठकीनंतर मच्छिमारांना प्रतिबंधित सागरी क्षेत्रात प्रवेश करू नये अशी सूचना दिली आहे. अधिकाऱ्यांनी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करावे असे नमूद केले आहे. सुरक्षेचा एक भाग म्हणून मुंबईतील सर्व मासेमारी नौकांचे लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यांचा डेटा मोबाईल अॅपद्वारे डिजिटल पद्धतीने गोळा केला जाणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांना जहाजांचा मागोवा घेण्यास आणि त्यांचे निरीक्षण करण्यास मदत होणार आहे. नौदलाने हाय अलर्टही जारी केला आहे. या अलर्टमध्ये नौका जप्त केल्या जाण्याचा आणि शत्रू सैन्याकडून वापरल्या जाण्याचा धोका असल्याचे नमूद केले आहे. मुंबईच्या किनाऱ्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पुण्यातही अलर्ट जारी
पुणे शहरातील अनेक संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीमेवरील वाढत्या तणावादरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), पुणे विमानतळ, शहरातील हवाई तळ आणि प्रतिष्ठित दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यासारख्या प्रमुख ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद वस्तू, व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता, यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सैन्याने पाकिस्तानी विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील सध्या सुरू असलेल्या तणावाची जगभरात चर्चा होत आहे.
22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सूडाचा प्रयत्न सुरू असून, भारतातील प्रमुख शहरांना लक्ष्य केले जात आहे.