सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 जिल्हा

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – मंत्री दादाजी भुसे

डिजिटल पुणे    13-05-2025 16:22:15

मुंबई  : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत,अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या

दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५८ हजार ०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी ९४.१० अशी आहे.

 

दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय

 

नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील ८,८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९२.२७ अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही श्री. भुसे यांनी अभिनंदन केले आहे.

मुलींची आघाडी

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९६.१४ इतकी असून मुलांची टक्केवारी ९२.३१ इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्क्यांनी जास्त आहे.

दहावीच्या एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर २३ हजार ४८९ शाळांपैकी ७९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी प्रविण्यासह प्रथम श्रेणीत तर ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केले आहे.

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.८२ टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात ९४.८१, छत्रपती संभाजीनगर विभागात ९२.८२, मुंबई विभागात ९५.८४, कोल्हापूर विभागात ९६.८७, अमरावती विभागात ९२.९५, नाशिक विभागात ९३.०४ आणि लातूर विभागात ९२.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती