शिर्डी : शिर्डी साईबाबाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. साईबाबा मंदिरात आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे. याआधी ही मर्यादा २५,००० रुपये होती. त्यामुळे इच्छा असूनही अनेक भाविकांना आरतीचा लाभ मिळत नव्हता. मात्र शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर ही पॉलिसी राबवली जाणार आहे.
कशी आहे डोनेशन पॉलिसी?
१०००० ते ५०००० रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना विशेष आरतीचा पाच सदस्यांना लाभ मिळणार
५०००० ते १००००० रुपये देणगी देणाऱ्या भाविकांसाठी दोन आरत्यांचा लाभ आणि वर्षातून एकदा कुटुंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शनाचा लाभ मिळणार
१००००० लाख ते १०००००० लाख देणगी देणाऱ्यांना वर्षातून एकदा दर्शनाची लाईफटाईम सुविधा आणि दोन व्हीव्हीआयपी आरत्यांचा लाभ
१०००००० लाख ते १५००००० रुपये देणाऱ्या भाविकांना वर्षातून दोन व्हीव्हीआयपी आरती आणि वर्षातून एकदा पाच सदस्यांना लाईफटाईम व्हीआयपी दर्शनाची सुविधा
५०००००० रुपयांच्या पुढे देणगी देणाऱ्या भाविकांना तीन व्हीव्हीआयपी आरती आणि वर्षातून दोनदा लाईफटाईम व्हीआयपी दर्शन
पंढरपूरच्या धर्तीवर सुरुवातीला आलेल्या सामान्य दर्शनरांगेतील दोन भाविकांना आरतीचा लाभ मिळणार
साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक साईचरणी सोनं, चांदी, मौल्यवान दागिने तसेच रोकड स्वरूपात दान अर्पण करतात. सध्या साईबाबा संस्थानकडे एकूण 514 किलो सोनं आहे. तर निम्म्या सोन्याचा वापर दररोजच्या पूजेसाठी केला जातो. यामध्ये साईबाबांचे सिंहासन, सोन्याचे मुकुट, मंदिरातील गाभारा व हार यांचा समावेश आहे. वापरात नसलेलं उर्वरित सोनं स्ट्राँग रूममध्ये पूर्णतः सुरक्षितरीत्या ठेवण्यात आलं आहे. तर 155 किलो सोनं वितळवून 1, 2 व 5 ग्रॅम वजनाची नाणी तयार करण्याचा प्रस्ताव संस्थानने 2021 मध्ये सादर केला होता. या प्रस्तावास 2023 मध्ये शासनाची परवानगी मिळाली. मात्र याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.