सोलापूर : राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला असून, अनेक विद्यार्थ्यांनी अपेक्षित वा अपेक्षेपेक्षा जास्त यश संपादन केले आहे. असे असले तरी काही विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सर्वच विषयात ३५% गुण असे आपल्या शैक्षणिक गुणांच्या संख्येने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
यात सोलापुरातील गरीब चर्मकार समाजातील शिवम सचिन वाघमारे आणि मुस्लिम समाजातील इमरान अब्दुल्ला शेख अशा दोन विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांत ३५ % गुण मिळाल्यानंतर, त्यांनी घरातील प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या संघर्षाची जाणीव असलेल्या अनेक नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गुणांची सूज ही गुणवत्ता नसते, आजपर्यंत कर्तृत्व सिध्द करणारी अनेक मातब्बर मंडळी ही अशिक्षित, अल्पशिक्षित असल्याची अनेक उदाहरणे आहेत. जीवघेण्या स्पर्धेच्या जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक अनेक ठिकाणी अनेकजण करत असतात, परंतु कमी गुण मिळाले तरी त्यात कमीपणा नाही असे प्रोत्साहन देऊन या विद्यार्थांना अनेकांनी शुभेच्छा देऊन वेगळा संदेश दिला आहे.