सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

गायक, कलावंतांनी  कालानुरूप होणारे बदल स्वीकारले पाहिजे - पं. अजय पोहनकर

डिजिटल पुणे    20-05-2025 10:42:22

पुणे : आजच्या युवा पिढीला ऐकण्यासाठी मी इथे आलो आहे. गायकांनी भूतकाळात न जागता बदल मान्य केले पाहिजेत. आज कराओके च्या युगात गायकांना वाद्यवृंदासह गायनाचे व्यासपीठ मिळवून देण्याचे सोमेश्वर फाऊंडेशनचे काम  कौतुकास्पद आहे. या संधीचा फायदा महाराष्ट्रातील नवोदित गायकांनी घ्यावा, गायक, कलावंतांनी  कालानुरूप होणारे बदल स्वीकारले पाहिजे असे मत ज्येष्ठ गायक पं. अजय पोहोणकर यांनी व्यक्त केले.  

सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे पुणे आयडॉल स्पर्धा. या स्पर्धेचे उद्घाटन आज  पं.  भीमसेन जोशी सभागृह, औंध येथे   पं. अजय पोहणकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सावनी रविंद्र (राष्ट्रपती पदक विजेती गायिका), सोमेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण, स्वातीताई निम्हण, नंदकुमार वाळुंज, बिपिन मोदी, ज्ञानेश्वर मुरकुटे आदि मान्यवर  उपस्थित होते. 

पुढे बोलताना पं. अजय पोहणकर म्हणाले, जसे जुनी घरे जाऊन आज ऊंच इमारती निर्माण झाल्या, भावना तीच आहे फक्त स्वरूप वेगळे असते तसेच गायनातही बदल होत आहेत, ते कलाकारांनी स्वीकारून पुढे गेले पाहिजे. आजच्या स्पर्धेतील मुलांना मी सांगू इच्छितो की त्यांनी श्रवण करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्यातूनच आपण एक चांगले गायक होऊ शकतो.  आयुष्यात स्पर्धा ही दुय्यम असते, तुम्ही प्रामाणिकपणे गाणे गात रहा असा सल्ला त्यांनी स्पर्धकांना दिला. 

सावनी रवींद्र म्हणाल्या, एखादी गोष्ट सुरू करणे सोपे असते मात्र त्यामध्ये सातत्य टिकवणे अत्यंत अवघड काम असते. सोमेश्वर फाऊंडेशनने ते काम करून दाखवले आहे.  लहानपणापासून या व्यासपीठावर येण्याची इच्छा होती, आज इथे येता आले हे मी माझे भाग्य समजते. 

प्रास्ताविक पर भाषणात  सनी विनायक निम्हण म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा यासह कला, क्रीडा, सांस्कृतिक वारसा जोपासला तर एक समृद्ध जीवनशैली तयार होते अशी सोमेश्वर फाऊंडेशनची भावना आहे. यामुळेच आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, समृद्ध जीवनशैली साठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल महत्वाची असते. त्या अनुषंगाने काम करत  मागील 23 वर्षांपासून पुणे  आयडॉल च्या माध्यमातून काम करत आहोत.   

पुणे आयडॉल स्पर्धा चार गटात होते. या स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार, 24 मे 2025 रोजी  दु. 12  ते  3 यावेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. तसेच या दिवशी  बक्षीस समारंभ कार्यक्रमानंतर  जितेंद्र भूरुक प्रस्तुत 'गीतों का सफर' या  सांगीतिक कार्यक्रमाने स्पर्धेची सांगता होणार आहे.

अमित मुरकुटे, हेमंत कांबळे, अनिकेत कपोते, वनमाला कांबळे, संजय माजिरे, गणेश शेलार, संजय तरडे आदि  कार्यकर्ते स्पर्धेच्या यशासाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे परीक्षण गायक जितेंद्र भुरुक आणि मुग्धा वैशंपायन करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि महेश गायकवाड यांनी केले तर उमेश वाघ यांनी आभार मानले.


 Give Feedback



 संबंधित बातम्या
 जाहिराती
 जाहिराती