कोलंबो : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनकारी कला विभागाचे वरिष्ठ सहायक प्रोफेसर डॉ. सतीश पावडे यांनी श्रीलंका येथे भरतमुनीच्या नाट्यशास्त्रावर नुकताच दोन व्याख्याने दिलीत. कोलंबो येथील प्लेटो अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स द्वारे या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.डॉ. पावडे यांनी भरताचे नाट्यशास्त्र या ग्रंथाचा परिचय आणि भरतप्रणित अभिनय: सिद्धांत आणि प्रात्यक्षिक या दोन विषयांवर ही व्याख्याने दिलीत. कोलंबो येथील महारगम सेंट्रल कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.डॉ. पावडे यांनी भारतीय ज्ञान परंपरेच्या परिप्रेक्षामधे नाट्यशास्त्र या ग्रंथाचा परिचय करून दिला. भारतीयच नाही तर वैश्विक कला परंपरेच्या वारशाच्या रूपात नाट्यशास्त्राची प्रासंगिकता त्यांनी पटवून दिली. प्लेटो अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानात त्यांनी भरत वर्णित अभिनय कलेचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक विवेचन प्रस्तुत केले.
कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रसिद्ध पुरातत्व विद्वान डॉ. रांदणू विदुल सोईसा यांच्या "टुरिझम अँड टुरिस्ट" या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा डॉ. पावडे यांच्या विशेष उपस्थितीत या वेळी संपन्न झाले. प्लेटो अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालिका आशा हंसीनी परेरा, डॉ.रांदणू आणि उपस्थित गणमान्य यांच्या हस्ते डॉ. सतीश पावडे आणि विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनकारी कला विभागाचे संशोधक विद्यार्थी विष्णुकुमार यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
बुद्धिष्ट आणि पाली विश्वविद्यालय श्रीलंकाचे माजी कुलगुरु प्रोफेसर इथाडेमलिये इंदसारा, माजी राजनायक दिनेश गुणवर्धने, माजी सांसद यादामिनी गुणवर्धने , श्री जयवर्धने विश्वविद्यालयाचे प्रोफेसर अलेक्झांडर,श्रीलंका नॅशनल यूथ कौन्सिल के माजी अध्यक्ष डॉ . सेनरथ विक्रमसिंघे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाची माजी विद्यार्थिनी तसेच श्रीलंकन नाट्य अभिनेत्री थीलिनी मुनसिंघे लिवेरा आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रच्या शेवटी प्लेटो अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स द्वारा निर्मित, आशा हंसीनी परेरा द्वारा दिग्दर्शित कँडी नृत्य, कोल्लम आणि सोकारी लोकनाट्याची प्रस्तुति सादर करण्यात आली.
नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा
प्लेटो अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स द्वारे तीन दिवसीय नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते . डॉ. सतीश पावडे हे कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक होते तर संशोधक विद्यार्थी विष्णुकुमार प्रशिक्षक होते. कार्यशाळेचे संयोजन प्लेटो अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि आशा डान्स स्टुडिओच्या संचालिका , प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री, नाट्य दिग्दर्शक आशा हंसीनी परेरा यांनी केले होते. या कार्यशाळेत 30 नाट्य कलावंतांनी भाग घेतला. डॉ. पावडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आलीत.