सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

मराठी-महाराष्ट्राच्याबाबतीत तडजोड नाहीः राज ठाकरे यांचा पुन्हा इशारा

डिजिटल पुणे    30-06-2025 15:49:02

मुंबई : मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तडजोड होणार नाही, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांना सुनावले आहे. यानंतर सरकार अशा उद्योगात पडणार नाही, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. इतकेच नाही तर आता अधिवेशनात या विषयावर वेळ वाया घालवू नका, असा सल्ला देखील त्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना दिला आहे. राज्यातील इतर प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठवा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

हिंदीची सक्ती करणारा आदेश रद्द झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी राज ठाकरे म्हणले की, अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये. महाराष्ट्रात अनेक प्रश्न तुंबलेले आहेत. त्यामुळे त्या प्रश्नावर बोलावे. शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत, शाळा नाही, शिक्षकांना पगार नाहीत, एकेका शिक्षकावर वर्क लोड टाकला जात आहे, इतरही कामे देखील शिक्षकांना दिले जात आहेत. इतके विषय आहेत, त्या विषयावर विरोधकांनी हात घालावा, असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करायला सरकारला भाग पाडले. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे, साहित्यिकांचे, पत्रकारांचे आणि राजकीय पक्षांचे आभार आहे. हिंदी राष्ट्रभाषा नाही. ५ जुलैला जर मोर्चा निघाला असता तर तो न भूतो असा झाला असता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण अनेकांना आली असती. या विषयावर कुठलीही तडजोड होणार नाही. हे स्लो पॉयजनसारखे आहे, हळूहळू गोष्टी आतमध्ये पेरायच्या. हा प्रयत्न सरकारने करून पाहिला परंतु तो अंगाशी आला. समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा किंवा नाही याचे आम्हाला देणेघेणे नाही. या गोष्टी आम्ही मान्य करणार नाही. परत या गोष्टी सरकारने आणूच नये. हिंदी आणण्याचा का प्रयत्न केला जातोय हे माहिती नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही. ती एका प्रांताची भाषा आहे. उत्तर भारतातील अनेक जण इथे येतात मग तिथे मराठी शिकवली पाहिजे. दीडशे वर्षाची भाषा ३०० वर्षाच्या भाषेवर वरचढ ठरवण्याचा प्रयत्न झाला ते मान्य होणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर संजय राऊतांचा फोन आला होता. मोर्चा रद्द झाला तरी विजयी मेळावा ५ जुलैला होईल. हा विजय मराठी माणसाचा आहे. त्या दृष्टीने या मेळाव्याकडे पाहिले पाहिजे. ज्याप्रकारे वर्तमानपत्र, टेलिव्हिजन चॅनेलने हा विषय लावून धरला त्याबद्दल सर्वांचे आभार आहे. ५ तारखेचा विजयी मेळावा कुठे होईल, केव्हा होईल हे आमच्या नेत्यांशी आणि त्यांच्याशी बोलून ठरवले जाईल. मोर्चा असो वा विजयी मेळावा याला राजकीय पक्षाचे लेबल लावू नका. युती, आघाडी होत राहील मराठी भाषेवर संकट म्हणूनच याकडे पाहावे. ५ जुलैच्या मेळाव्यात आणखी काही गोष्टी बोलेन असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काळात हा विषय आल्याचे मला कळले, मला अजून त्याची माहिती नाही परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणूस, मराठी भाषेविरोधात कुणीही असेल तर त्याला मी विरोध करणारच. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला हीच विनंती आहे. मराठी भाषा, मराठी माणूस यावर तडजोड होता कामा नये. सर्व बाजूने महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी माणसाने आजूबाजूला काय गोष्टी घडतायेत त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे असं आवाहनही राज यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती