मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शेतकऱ्यांबद्दल सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.महाराष्ट्र विधानसभेत आज मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जात राजदंडाला स्पर्श केल्याप्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांना दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात ययाबाबतची घोषणा केली.
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सभागृहात आज गदारोळ झाला. बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी यासाठी विरोधकांनी मागणी केली. नाना पटोले यांनी ही मागणी जोरकसपणे मांडली, यावेळी त्यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जात राजदंडाला स्पर्श केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पटोले यांनी एक दिवसांसाठी निलंबित केले.
नाना पटोले म्हणाले की, या सरकारमधले सदस्य बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ज्या पद्धतीने सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान आता राज्यातील शेतकरी सहन करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. ज्या पद्धतीने सातत्याने मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. असे वक्तव्य अजिबात चालणार नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे म्हणत नाना पटोले यांनी जोरदार संताप व्यक्त केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, नाना पटोले तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणे, मला बरोबर वाटत नाही, हे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले.
सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसचे आमदार आणि माजी अध्यक्ष नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर विरोधकांनी तीव्र निषेध नोंदवत एकमुखीपणे सभात्याग केला. ही घटना राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर लोकशाहीचा गळा घोटण्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही, नाना पटोले यांनी माफी मागितली पाहिजे, असे म्हटले. यानंतर नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करणार आल्याची घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली. सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे, यासाठी मी नाना पटोले यांना निलंबित करत आहे, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले. तसेच, तुम्हाला निलंबित केलेला आहे, तुम्ही सभागृहाच्या बाहेर गेलं पाहिजे, असे राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना म्हटले. यानंतर नाना पटोले सभागृहाच्या बाहेर निघून गेले. नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन करण्यात आल्याने विरोधकांनी सभात्याग केला.