बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आता राजकीय घमासान सुरु झाले आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एसआयटी चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक केली. मात्र, यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे.
दमानिया यांनी आपल्या ट्विटरवरून संतप्त प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंवर थेट हल्लाबोल केला. “जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराचे आरोप आहेत, त्याच्या मागणीवर मुख्यमंत्री एका दिवसात SIT नेमतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अंजली दमानिया यांनी ट्वीट करत म्हटले की, “काल धनंजय मुंडेंना बीडमधील प्रकरणावर बोलताना पाहून राग आला. ज्याच्यावर स्वतः महिलांच्या बाबतीत गंभीर आरोप आहेत, त्याला या विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही. अशा प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सुसंस्कृत लोक लढू शकतात. आम्ही लढणारच आहोत.”तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून विचारले की, “वैष्णवीच्या प्रकरणात मी तिच्या पालकांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले होते, तेव्हा फास्ट ट्रॅकची मागणी करूनसुद्धा महिनाभरानेच कारवाई झाली. मग आता इतक्या तत्परतेने कारवाई का केली? सगळ्या महिला आमदारांनी याला विरोध केला पाहिजे. महिलांच्या तक्रारी तत्काळ ऐकल्या गेल्या पाहिजेत.”
अंजली दमानियांच्या ट्वीटमधून मुख्यमंत्र्यांना सवाल
अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नुकतेच एक ट्वीट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली?” या संदर्भात, दमानिया यांनी आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची विधानभवनात भेट घेणार असल्याचेही सांगितले. दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, “काल धनंजय मुंडेंना बीडच्या अल्पवयीन मुलीवर भाष्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएसची एसआयटी लावतात?” दमानिया यांनी बीडच्या पीडित मुलीला तातडीने न्याय मिळावा या मताशी सहमत असतानाच, या लढ्यासाठी सुसंस्कृत व्यक्तींची गरज असल्याचे म्हटले आहे. “बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणसे आहेत. आम्ही नेहमीप्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
“हे सगळं राजकारणाचाच भाग वाटतो” – ठाकरे बंधूंवरही टीका :
अंजली दमानिया यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यावरही भाष्य केलं. “मला वाटतं यांचा लढा मराठी माणसासाठी नाही, तर तो अस्तित्व टिकवण्याचा राजकीय प्रयत्न आहे.विधान भवनात मराठीच लोक आहेत, पण जनतेला दाखवलं जातं की हीच एखादी पार्टी मराठी माणसासाठी लढते – हे सगळं निव्वळ राजकारण आहे,” असेही त्या म्हणाल्या.