पुणे : मावळचे आमदार आणि अजित पवार गटाचे नेते सुनील शेळके यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप केला आहे. याबाबत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रदेखील पाठवले आहे. मात्र, शेळके यांनी राऊतांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. राऊत यांचे आरोप बिन बुडाचे आहेत. राजकीय सूडबुद्धीने संजय राऊत हे असे आरोप करत आहेत. असे शेळके यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळसाठी, औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४ येथे मावळ तालुक्यात गाव मौजे आंबळे आहे. या गावात व त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. सदर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नसल्याने ते सर्व खाणीचे गट, जमिनी वगळण्यात आल्या आहेत. तरी शेळके आपल्या आमदार पदाचा दरुपयोग करुन औद्योगिक क्षेत्रामध्ये आंबळे येथील त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या २९ हेक्टर ८३.१० आर क्षेत्रावर औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय (१९६१ च्या प्रकरण ६) काढून सदरच्या जमिनी संपादन करत आहेत. तसेच शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर दगड खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे. असा आरोप राऊत यांनी पत्रात केला आहे.
तसेच, शेळके यांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही. मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गौण खनित उत्खनन केलेले आहे. शेळके व त्यांच्या कुटुंबीयोांनी उत्खनन करताना त्या जमिनीमधून असणारे मुख्य गाव रस्त्ये फोडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत शासनाकडून शेळके यांनी कोणत्याही प्रकारचा जाब विचारण्यात आलेला नाही. या सर्व प्रकरणामध्ये राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारीदेखील सहभागी आहेत. त्याचीदेखील आपल्या कार्यालयामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीदेखील राऊत यांनी केली आहे.
शेळकेंचा राऊतांना पुरावादेण्यासाठी अल्टीमेटम
संजय राऊत यांचे आरोप बिन बुडाचे आहेत. राजकीय सूडबुद्धीने संजय राऊत हे असे आरोप करत आहेत. संजय राऊत यांनी जर मला पुरावे दिले तरच मी त्यांच्या आरोपाला उत्तर देईन. असे शेळके यांनी म्हटले आहे. तसेच, १५ तारखेपर्यंत संजय राऊत यांनी जे आरोप केलेत त्यावर पुरावे द्यावेत. राजकारण विचाराने असावे सूडबुद्धीने नसावे.
याआधी कुंडमळा पूल जेव्हा पडला, त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे आरोप माझ्यावर संजय राऊत यांनी केले होते. जोपर्यंत ते पुरावे देत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या आरोपावर स्पष्टीकरण देणार नाही. त्यांनी माहिती घ्यावी की माझी कुठली चौकशी सुरू आहे का? माझा आधीपासून व्यवसाय आहे त्यामुळे कुटुंबाला याच्यात ओढू नये, असेही सुनील शेळके यांनी म्हटले आहे.