सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाप्रित’च्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक

डिजिटल पुणे    04-07-2025 14:49:18

मुंबई : महात्मा फुले नवीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या उपकंपनीने भविष्यातील आव्हानांचा विचार करून दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत असलेल्या महात्मा फुले नविकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित)च्या विविध प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,  राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते.

बैठकीत ठाणे समूह विकास प्रकल्प, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि डेटा सेंटर प्रकल्प, भिवंडी महापालिकेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठीचा रुफ टॉप सोलर प्रकल्प, एनटीपीसी ग्रीन सोबत सोलर/हायब्रिड प्रकल्प राबविणे, एनटीपीसी ग्रीन, एनआयआरएल, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया -एसईसीआय यांच्या संयुक्त भागीदाराने उभारण्यात येत असलेले सौर उर्जा प्रकल्प, डिस्ट्रिक्ट कुलिंग सिस्टीम प्रकल्प, नागपूरमधील राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या आवारात सोलर प्रकल्प उभारणे, पुणे महापालिकेचे एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर उभारणे, महालक्ष्मी मंदिर व परिसराचा पुनर्विकास इत्यादी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या विविध प्रकल्पांच्या प्रगतीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.

झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प वेगात पूर्ण करावेत. सर्वच क्षेत्रांमध्ये प्रकल्प राबवण्याऐवजी विशिष्ट क्षेत्रात तज्ज्ञता (एक्स्पर्टीज) मिळवून त्या ठराविक क्षेत्रातच काम करावे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, प्रधान सचिव के.एच. गोविंदराज, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक विजय काळम पाटील, महात्मा फुले महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदार आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती