मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलैपर्यंत ज्यांची मतदार यादीत नावे आहेत, त्यांनाच आता मतदान करता येणार आहे. त्यानुसार १ जुलै अंतिम केलेली मतदार संख्या, मतदार यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करुन निवडणुकीचे नियोजन करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिला आहे.
राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियोजन सुरू केल आहे. एकूण मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. त्यासाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी वाघमारे यांनी निर्देश दिले आहेत.
मतदान केंद्रांची संख्या वाढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरली जाते. १ जुलै पर्यंत नावे नोंदविलेली यादी उपलब्धतेबाबत भारत निवडणूक आयोगाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यी पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढेल. मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेशाद्वारे निकष निश्चित केले आहेत. अशी माहिती वाघमारे यांनी यावेळी दिली आहे.
मतदारांसाठी सुलभ व्यवस्था
सर्वसामान्य तसेच दिव्यांग मतदारांची सोय लक्षात घेईन मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शौचालय, रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था यांचा समावेश आहे.
मतदान यंत्रांची तातडीने तपासणी
राज्यात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्यातील तपासणी तातडीने सुरु करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यंत्रांची सुरक्षितता, कार्यक्षम स्थिती आणि निवडणुकीसाठी तयार ठेवण्यासोबतच गरजेनुसार नव्य यंत्रांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे.