मुंबई : संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट येथे आयोजित सत्कार समारंभात गायकवाड यांच्यावर शाई फेकण्यात आली आणि त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला आणि गायकवाड यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. या प्रकरणावरून विधानसभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत काही कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांचा काय दोष होता? कुठले कारण असावे? त्यांच्या संस्थेचे नाव संभाजी आहे, इतकेच कारण होते. अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहे. त्यांना मारहाण झाली का? ही संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचार प्रणालीवर काम करणारी आहे. परंतु ज्या पद्धतीने हल्ला झाला, त्यांना अमानुषपणे गाडीतून उतरवून काळे फासण्यात आले. नुसते काळे फासले नाहीतर कॉलर धरून ओढून खाली पाडले, असे त्यांनी म्हटले.
या घटनेवरून विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्नांची सरबत्ती केली. “गायकवाड यांच्यावर अमानुषपणे हल्ला झाला. त्यांना गाडीतून खेचून बाहेर पाडण्यात आले, तोंडाला काळं फासण्यात आलं. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता. या घटनेत एका पक्षाचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कार्यकर्ता सामील होता. त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा आहे, त्याने चुलत भावाची हत्या केली आहे आणि तुरुंगवास भोगला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
वडेट्टीवार यांनी प्रश्न केला की, “या कार्यक्रमासाठी कोणतीही पोलिस सुरक्षा का नव्हती? हल्ल्याची माहिती गुप्तचर विभागाला नव्हती का? प्रवीण गायकवाड यांच्यासाठी कायदा लागू होत नाही का?”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर सभागृहात उत्तर देताना सांगितले की, “घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस कारवाई सुरु आहे आणि या प्रकरणात योग्य ती कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले.