पुणे : पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरवात केली आहे. विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी आत घुसले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर एन एस यु आय, युवक काँग्रेस विविध विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.कुलगुरुंची भेट घेण्यासाठी ते आले आहेत. निकालात घोळ असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. एकूण मार्काच्या फक्त दहा टक्के ग्रेस असतो तर 50 मार्काच्या पेपरला जो पाच मार्काचा ग्रेस मिळाला पाहिजे तर एका विद्यार्थिनीला नऊ मार्क्स आहेत तरीसुद्धा तिला ग्रेस देऊन 20 मार्क्स केलेले आहेत 11 मार्क्स वाढवलेले आहेत. अशा विविध मुद्द्यांवरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
इंजिनिअरिंग परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. मात्र, या निकालातील बऱ्याच निकालांमध्ये घोळ असल्याचे देखील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या या आंदोलनात विद्यार्थी आक्रमक झाले असून बॅरिकेट्स तोडून ते विद्यापीठातील कुलगुरुंच्या कार्यालयाकडे जात असल्याचे दिसून आले. यावेळी, पोलिसांनी त्यांना अडवले मात्र आपल्या मागण्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
केवळ एका विषयासाठी आमचं संपूर्ण वर्ष वाया जाऊ नये, त्यामुळे आम्हाला कॅरी ऑन देण्यात यावा अशी मागणी करत विद्यापीठातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी इतरही विभागाचे सर्व विद्यार्थी एकत्र जमले असून हे आंदोलन अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
शेकडो विद्यार्थी विद्यापीठात ठिय्या आंदोलन करत आहेत. आमची पुन्हा परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे. विद्यापीठाच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यर्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यानी विद्यापीठाचे गेट तोडून आत प्रवेश केला आहे. आमच्या निकालामध्ये घोळ झाला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाचे कुलगुरू खाली येऊन आमचे निवेदन अथवा आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोवर आम्ही हटणार नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कॅरी ऑनच्या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी आज सकाळपासून आंदोलन करत होते, त्यात निकालातही काही त्रुटी असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलना वेळी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे, अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन होते.