उरण : उरण तालुका अपघात निवारण समिती (नि)ने आजपर्यंत अनेक समस्यावर आवाज उठविला आहे.रस्ते अपघात, वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आदींवर नियंत्रण, अद्ययावत रूग्णालय, अपघातग्रस्तांना मदत, पार्किंग झोन, मास्टर प्लॅन, पायाभूत सुविधा इ. मागण्यांसाठी तालुक्याची शिखर संघटना म्हणून उरण तालुका अपघात निवारण समिती उरण तालुक्यात कार्यरत आहे.उरण मधील वाढते अपघाताचे प्रमाण, मृत्यूची वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, ड्रायवर लोकांचे बेशिस्तपणा, अवैध पार्किंग आदी समस्या लक्षात घेता ट्रेलर-कंटेनर, डंपर आदी जड वाहनांवर ड्रायव्हरसोबत क्लीनर (अटेंडंट) ची नेमणूक करण्याची मागणी उरण तालुका अपघात निवारण समिती उरण तर्फे करण्यात आली आहे.तसे आदेश त्वरित काढण्याचीही मागणी करण्यात आली आहे.उरण तालुका अपघात निवारण समिती (नि)तर्फे पोलीस उपायुक्त,वाहतूक विभाग कोकण भवन, सीबीडी बेलापूर नवी मुंबई व संबंधित विभागांच्या कार्यालयात निवेदना द्वारे करण्यात आली आहे. तसे आदेश त्वरित काढण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
जेएनपीटी बंदर परिसरात रोज अहोरात्र हजारो ट्रेलर-कंटेनर, डंपर आदी जड वाहनांची वाहतूक होत असते. या वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे, महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील अवैध पार्किंगमुळे वारंवार अपघात होऊन कित्येकांना जीव गमवावे लागले आहेत, तर अनेक जबर जखमी झालेले आहेत. येथील नागरीकांना वाहतूक कोंडीचाही त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी पोलीस प्रशासना सोबत याआधीही पत्रव्यवहार केलेला आहे व त्यानुसार पोलीस प्रशासन तर्फे दि. २९/०४/२०२५ रोजी संयुक्त बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते.मात्र कोणतेही कारवाई होताना दिसून येत नव्हती.ट्रेलर-कंटेनर, डंपर आदी जड वाहनांवर ड्रायव्हर सोबत क्लीनर अटेंडंट असण्याबाबतच्या आवश्यकतेवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.ही बाब समितीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. जेएनपीए परिसरातील १५-२० मुंबई कि. मी. परिघात रोज हजारो ट्रेलर-कंटेनर, डंपर चालत असतात. यातील कुठल्याच वाहनावर (काही मोजके अपवाद सोडल्यास) क्लीनर अटेंडंट नसतो. चाळीस फूट लांबीची अजस्त्र वाहने, कंटेनर चालताना, वळवताना, बाजुला घेताना, लेन बदलताना किंवा आकस्मिकपणे धांबवताना ड्रायव्हर सोबत क्लीनर (अटेंडंट) नसेल तर त्याला आजुबाजुची दिशा समजणार नाही. उरण विभागात अपघात होण्यास हे एक प्रमुख कारण आहे.
उरण, पनवेल तालुक्यातील जेएनपीए प्रभावित क्षेत्रात सुमारे ५०-६० मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. येथील सर्व नागरिक जेएनपीए / नवी मुंबई प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना सुख-दुखात एकमेकांच्या घरी जाणे, बाजार-हाट करणे, विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाणे, नोकरी-व्यवसाय आदी अनेक कारणांसाठी या जीवघेण्या वाहतुकीतून प्रवास करावा लागतो, रस्ते ओलांडावे लागतात. त्यामुळे या अव्यवस्थेचे अधिक बळी हे स्थानिक नागरिक पडतात.आणिबाणीच्या प्रसंगी वाहन अपघात झाल्यास किंवा इतर आणिबाणीच्या प्रसंगी क्लीनरचे महत्त्व अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. अपघात घडल्यास क्लीनर अपघातग्रस्तांना मदत करू शकतो, वाहतूक नियंत्रण करू शकतो, वाहतूक पोलीस विभागाला माहिती देऊ शकतो. त्यामुळे अपघातग्रस्ताचा जीव वाचू शकतो. रात्री-बेरात्री तर क्लीनरचे अस्तित्त्व फार महत्त्वाचे ठरते.विशिष्ट परिस्थितीत एखाद्या १५-२० कि.मी.च्या परिघात रोज, चोवीस तास, हजारो ट्रेलर-कंटेनर, डंपर आणि इतर वाहनांची वाहतूक होणे आणि याच परिसरात ५०-६० मोठ्या लोकसंख्येची गावे असणे, एखादा तालुका पूर्णपणे ट्रेलर-कंटेनरच्या वाहतुकीने त्रस्त असणे ही एक विशिष्ट बाब आहे.
त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता प्रत्येक ट्रेलर-कंटेनर, डंपर आदी वाहनांवर ड्रायव्हर सोबत क्लीनर असावा याबाबतचे आदेश जारी करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी समितीच्या माध्यमातून जेएनपीएचे माजी विश्वस्त कॉ. भूषण पाटील, जेएनपीएचे विश्वस्त रवी पाटील, जेएनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. अतिरीक्त पोलीस महासंचालक (वाहतूक)मुंबई,मा. पोलीस आयुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय नवी मुंबई, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक)नवी मुंबई, मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक (वाहतूक विभाग) उरण, पनवेल यांच्यांकडे पत्रव्यवहारद्वारे केली आहे.ट्रेलर-कंटेनर, डंपर आदी जड वाहनांवर ड्रायव्हर सोबत क्लीनर (अटेंडंट )ठेवल्यास अनेक विविध समस्या सुटणार आहेत त्यामुळे जनतेनी सुद्धा या मागणीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. लवकरात लवकर वाहणावर क्लीनर नेमावेत अशी मागणी आता जनतेतूनही होऊ लागली आहे.