बारामती : राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बारामतीमधील भिगवण रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय52 वर्ष) यांनी काल गुरुवारी 17 जुलै रोजी रात्री बँकेच्या शाखेतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवशंकर मित्रा हे मूळचा उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. बँकेच्या दबावामुळे मी आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये मित्रा यांनी म्हटलं आहे.
चिठ्ठीत काय लिहिलंय?
शिवशंकर मित्रा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले की, “मी शिवशंकर मित्रा, मुख्य प्रबंधक बँक ऑफ बडोदा बारामती, मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावाच्या कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी बँकेकडे विनंती आहे की, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू नका. सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर टक्के आपले योगदान देत असतात.”
मी पूर्णपणे शुद्धीत असताना व स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करत आहे. त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू नये. मी फक्त बँकेच्या प्रचंड दबावामुळे आत्महत्या करत आहे. पत्नी प्रिया यांना उद्देशून त्यांनी, प्रिया, मला माफ कर. माही मला माफ कर! असे त्यांनी पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांना लिहिलेलं आहे. शक्य झाल्यास माझे डोळे दान करावेत, अशी देखील इच्छा शिवशंकर मित्रा यांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर मित्रा हे मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आहेत, ते गेली अनेक वर्ष बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी मोठा दबाव असल्याने गेल्या काही दिवसांपासून शिवशंकर मित्र तणावाखाली होते. त्यांनी या संदर्भात घरच्यांशी चर्चा केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पाच-सहा दिवसापूर्वीच त्यांनी बँकेकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला होता, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना ही नोकरी सोडायची होती, ते अनेक दिवस वरिष्ठांना अतिरिक्त दबाव टाकू नका असे म्हणत होते, मात्र कोणीच ऐकले नाही. त्यामुळे काल रात्री उशिरा त्यांनी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. यामध्ये त्यांनी बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे स्पष्ट केले आहे.
भिगवण रस्त्यावरील 'बँक ऑफ बडोदा' बँकेच्या शाखेत काल (गुरुवारी) शिवशंकर मित्रा यांनी रात्री उशिरा आपलं जीवन संपवलं. बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्यावरील अतिरिक्त दबावाचा उल्लेख केला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र दान करावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळे सर्वजण भावूक झाले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्यासोबत काम करणाऱ्यांवर दबाव टाकू नका असंही म्हटलं आहे.