कल्याण : आयुष्याच्या रंगमंचावर हसवत, रडवत, शिकवत आणि प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लोकप्रिय कलाकार औदुंबर भाऊजी कळसाईतकर यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गाडी लोहार समाज उन्नती मंडळ, कल्याण-ठाणे यांच्यावतीने आयोजित समारंभात हा पुरस्कार देण्यात आला.
हा गौरव कल्याणच्या आमदार मा. सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी अध्यक्ष ॲड. युवराज जाधव, श्री. दत्ता लोहार, श्री. बाळासाहेब शेलार, श्री. रवींद्र कळसाईत यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

औदुंबर भाऊजी हे “खेल पैठणीचा - औदुंबर भाऊजींचा होम मिनिस्टर” या लोकप्रिय कार्यक्रमाचे सर्जक आणि सूत्रसंचालक आहेत. महाराष्ट्रभर त्यांनी आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त कार्यक्रम सादर करत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यक्रमातून हास्य, विचार आणि समाजप्रबोधन यांची त्रिसूत्री साधली जाते.
आई-वडिलांचे आशीर्वाद आणि रसिक मायबापांचे प्रेम यांची जाण ठेवून, औदुंबर भाऊजींनी प्रत्येक घराघरात आनंदाचे क्षण पोहोचवले आहेत. विशेषतः माता-भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा कलाकार आज महाराष्ट्रातील सर्व वहिनींचा लाडका बनला आहे.कलारत्न पुरस्काराने त्यांच्या या अविरत मेहनतीची, सामाजिक जाणीवेची आणि सांस्कृतिक योगदानाची दखल घेतली गेली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हा एक प्रेरणादायी टप्पा ठरला आहे.