पुणे : पुण्यात हडपसर भागातील 22 वर्षीय विवाहितेवर सासरच्या मंडळींनी अमानुष अत्याचार केले. लग्नानंतरच वागण्यात दोष असल्याचा आरोप करून अमावस्या-पौर्णिमेच्या रात्री नग्न अवस्थेत झोपायला भाग पाडलं. तिच्या अंगावर लिंबू ठेवणे, राख फासणे, मंत्र पुटपुटणे अशा अघोरी चाचण्या केल्या गेल्या. मूल पतीचं नसल्याचा संशय लावून पितृत्व चाचणीही अघोरी पद्धतीने करावी, असा हट्ट धरला. यामुळे तिचं मानसिक आरोग्य बिघडलं. हडपसर पोलीसांनी सासू-सासरे, पतीसह गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.
सासरकडील लोक अघोरी प्रथा पाळून मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याची फिर्याद एका २२ वर्षीय विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियमानुसार सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी विवाहितेस नग्न होऊन झोपण्यास सांगितल्याचे विवाहितेने फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच विवाहितेस झालेले मुल त्यांचे नाही असे म्हणून अघोरी परीक्षा देण्यास सांगितले. त्यानंतर सासरच्या नांदविण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.