जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात 'स्वीय सहायक' असल्याचे सांगत एका पती-पत्नीने 18 जणांची तब्बल 55 लाख 60 हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हितेश संघवी (वय 49), अर्पिता संघवी (वय 45) अशी आरोपींची नावे आहेत. ते मूळचे जळगावचे आहेत.रेल्वेमध्ये नोकरी, म्हाडामध्ये फ्लॅट आणि इतर अनेक आमिषे दाखवून ही फसवणूक नोव्हेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत केली. गुन्हे शाखेकडेद्वारे याचा तपास सुरू आहे.संघवी पती-पत्नी हे मूळचे पाचोरा येथील रहिवासी असून सद्यस्थितीत ते नवी मुंबई येथे राहत असल्याची माहिती आहे.
या दोघांनी एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे ओळखपत्र, लेटर पॅड व अपॉइंटमेंट लेटर दाखवून जळगावमधील हर्षल बारी या तरुणासह 18 जणांची फसवणूक केली. या सर्वांची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तब्बल 55 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणाने शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शनिपेठ पोलिसांकडून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास केला जात आहे.
या दाम्पत्याने नोव्हेंबर 2024 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार राबवला. यात हर्षल शालिग्राम बारी या व्यक्तीकडून एकट्याकडून 13 लाख 38 हजार रुपये, तर उर्वरित लोकांकडून मिळून 42 लाख 22 हजार रुपये उकळले. हा संपूर्ण आर्थिक व्यवहार जळगावमधील कालिका माता मंदिर परिसरातील दूध डेअरीमध्ये पार पडल्याचे उघड झाले आहे.
यानंतर बराच काळ वाट पाहूनही ना नोकरी मिळाली, ना कोणतेही आश्वासन पूर्ण झाले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हर्षल बारी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तत्काळ हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.