सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 DIGITAL PUNE NEWS

वाकडमध्ये आयटी अभियंत्याच्या पत्नीची आत्महत्या – हुंड्याच्या छळामुळे घेतलं टोकाचं पाऊल, पतीसह पाच जणांवर गुन्हा

अजिंक्य स्वामी    20-08-2025 14:20:44

पिंपरी चिंचवड  – पिंपरी-चिंचवडच्या वाकड भागात एका २६ वर्षीय आयटी अभियंत्याच्या पत्नीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिव्या सूर्यवंशी असे मृत विवाहितेचे नाव असून, हुंड्यासाठी पती आणि सासरच्यांकडून सातत्याने होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लग्नातील मोठा खर्च, तरीही सततच्या मागण्या

दिव्याच्या माहेरच्या लोकांनी सांगितले की, तिच्या लग्नासाठी तब्बल २० लाख रुपये खर्च करण्यात आला होता तसेच ४० तोळे सोनं देण्यात आलं होतं. इतकं दिल्यानंतरही तिच्या पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून सतत आणखी पैसे व सोनं द्यावे, असा दबाव टाकला जात होता.

सततचा छळ, अखेरीस आत्महत्या

लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांपासूनच दिव्याला छळ सहन करावा लागत होता. पती हर्षल सूर्यवंशी याच्याकडून वारंवार पैसा आणण्याचा तगादा लावला जात होता, तर सासरचे अन्य सदस्य घरकाम, नोकरी यावरून तिला कमी लेखत होते. हा छळ दिवसेंदिवस वाढत गेल्याने अखेरीस दिव्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिस कारवाई व आरोपी

या घटनेनंतर वाकड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हर्षल सूर्यवंशी (पती)

शांताराम सूर्यवंशी (सासरा)

कल्पना सूर्यवंशी (सासू)

योगेश सूर्यवंशी (दिर)

जयश्री पवार (नणंद)

यापैकी पती हर्षल व सासरा शांताराम यांना पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपींच्या शोधासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या सर्वांवर भादंवि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), कलम ४९८अ (पत्नीस छळ करणे) तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

कुटुंबीयांचा आरोप

दिव्याची आई ज्योती खैर्नार यांनी सांगितले, “मुलीने कित्येकदा सासरच्या छळाची व्यथा सांगितली होती. आम्ही समजावत राहिलो की ‘ते सुधारतील’, पण छळ वाढतच गेला. अखेर माझ्या मुलीने हे पाऊल उचललं.” तर दिव्याचा भाऊ देवेंद्र खैर्नार यानेही ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे.

समाजासाठी धक्का

या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडा प्रथेचे भयावह वास्तव समाजासमोर आले आहे. उच्चशिक्षित, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबातही हुंड्यासारख्या जुनाट प्रथेमुळे महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे यातून दिसून आले आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, न्याय मिळवून देण्यासाठी दिव्याचे कुटुंबीय ठाम आहेत.


 Give Feedback



 जाहिराती