पुणे : कोंढव्यात एका दुकानदाराकडे ५० हजारांची खंडणी मागून दुकानाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सोहेल शेख ऊर्फ पठाण (वय २७) आणि त्याच्या साथीदारांसह पाच जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला आहे. अश्रफनगर परिसरातील एका दुकानदाराने कोंढवा पोलिसांत यासंदर्भात फिर्याद दिली आहे.याबाबत एका २५ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोहेल शेख उर्फ पठाण (वय २७), साथीदार बल्ब यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचे कोंढव्यातील अश्रफनगर परिसरात दुकान आहे. आरोपी पठाण आणि त्याचे साथीदार २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याच्या दुकानात आले. त्यांनी दुकानदार तरुणाकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. तरुणाने खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी दुकानातील टेबल, तसेच सीसीटीव्ही स्क्रीनची तोडफोड केली. तसेच, तरुणाला धारदार हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी दुकानासमोर दहशत माजविली. त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी घाबरून त्यांची दुकाने बंद केली. आराेपी दुचाकीवरुन पसार झाले.
या घटनेनंतर, दुकानदाराच्या भावाने आरोपीशी संपर्क साधून दुकानात तोडफोड का केली, अशी विचारणा केली. त्यावर आरोपी पठाणने त्याच्याकडे पुन्हा ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही, तर सर्वांना जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. पोलीस उपनिरीक्षक खोपडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.