मुंबई : मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. जरांगेंच्या कोअर कमिटीला ही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसमध्ये असं म्हटलंय, की 'लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा. येथील आंदोलन बंद करा. आझाद मैदान सोडा. कारण, न्यायालय आणि पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे पुढील आंदोलनासाठी सर्व परवानग्या नाकारण्यात येत आहेत'. त्यामुळे आता जरांगे पुढे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. तर नोटीस मिळाली नसल्याचं कोअर कमिटीनं म्हटलंय.
ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते. त्यानंतर आता राज्य सरकार आणि मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर आज नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजवली आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आली आहे.
आझाद मैदान पोलिसांन जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत पत्रात म्हटले आहे. तसेच पत्रात मनोज जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्यचाही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे. तर नोटीस मिळाली नसल्याचं कोअर कमिटीचा दावा केला आहे.
मुंबई पोलिसांनी नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय?
१) प्रतिवादी क्र. ०५, ०६ व ०७ म्हणजेच आपण स्वतः, श्री. विरेंद्र पवार व आमरण उपोषण अंतरवाली सराटी, यांनी "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५ अन्वये सक्षम प्राधिकारी यांची परवानगी प्राप्त केल्याशिवाय आझाद मैदान, मुंबई येथे कोणतेही आंदोलन करू नये.
२) प्रतिवादी यांना असे आंदोलन करावयाचे असल्यास त्यासाठी त्यांनी "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५" अन्वये अर्ज सादर करावा.
३) मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत होवू नये यासाठी प्रतिवादी यांना खारघर, नवी मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा.
४) सक्षम प्राधिकारी यांनी प्रतिवादी यांना "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५ अन्यये आंदोलन करण्यास परवानगी दिल्यास सक्षम प्राधिकारी यांनी घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन प्रतिवादी करतील.
आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे आपण उल्लंघन केलेले असल्यामुळे तसेच, मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक २६/०८/२०२५ रोजीच्या त्यांच्या अंतरिम आदेशामध्ये दिलेल्या निर्देशांचे आपण उल्लंघन केलेले असल्याने, दिनांक ०१/०९/२०२५ रोजी आपण सादर केलेल्या विनंती अर्जानुसार (या पोलीस ठाण्याचे आवक क्रमांक ११३५/९/२०२५, दिनांक ०१/०९/२०२५) आपण मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी याद्वारे नाकारण्यात येत आहे. त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा.