पुणे : कोथरुड मतदारसंघातून आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हक्काची निवारा उपलब्ध झाला असून, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र पंढरपूर मधील कुंभार गल्ली परिसरात वारकरी भवन उभारण्यात आले आहे.
आषाढी आणि कार्तिक महिना आला की, विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले कोथरुड मतदारसंघातील कोथरुड, बाणेर-बालेवाडी, कर्वेनगर,सूस-म्हाळुंगे, पाषाण आदी भागांसह वारजे, वडगाव आदी भागातील हजारो वारकरी दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपुरच्या दिशेने पायी जात असतात. तिथे पोहोचल्यानंतर, त्यांच्या निवाऱ्याची आणि गैरसोईची समस्या नेहमीच सतावत असे. त्यामुळे वारकरी बांधवांसाठी पश्चिम हवेली वारकरी सेवा संस्था भवन उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे हा संकल्प पुर्णत्वास जाण्यास अनंत अडचणी येत होत्या. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना, सदर विषय त्यांच्या समोर आला असता, त्यांनी तात्काळ यासाठी पुढाकार यांनी अडचणी दूर केल्या. तसेच, लोकसहभागातून निधी गोळा करुन अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त वारकरी भवन उभारले.
या भवनाचे 30 ऑगस्ट रोजी लोकार्पण झाले. त्यावेळी बोलताना, ना. पाटील म्हणाले की, वारकरी बांधवांची सेवा म्हणजेच विठूरायाची सेवा आणि आज या पुण्यकार्याचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले. आणि या सेवाभावी कार्यात मला खारीचा वाटा उचलण्याची संधी लाभली याचा अपार आनंद होत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, ना. पाटील यांच्या कार्याप्रति कोथरुडमधील वारकरी बांधवांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, या भवनामुळे आषाढी आणि कार्तिकी वारीकाळात श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी सोय झाली आहे, अशी भवना, पश्चिम हवेली वारकरी सेवा संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी व्यक्त केली.
या लोकार्पण प्रसंगी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजप उपाध्यक्ष विठ्ठल आण्णा बराटे, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, अभिजीत राऊत, गिरीश भेलके, विवेक मेथा, प्रणव परिचारक, शंकरभाऊ मोकाटे, हरिभाऊ बराटे, संतोष बराटे, संग्राम दांगट, पंढरीनाथ दांगट, विठ्ठल चौधरी, रमेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.