मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावरील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर सरकारने मागण्या मान्य करत एका तासात जीआर काढला. हैद्राबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी, सातारा गॅजेटचा अभ्यास करून महिन्यात अंमलबजावणी, सप्टेंबरअखेरपर्यंत आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी व आर्थिक मदतीचे आदेश होणार आहेत. "मराठा आणि कुणबी एकच" या शासननिर्णयासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला. मागण्या मान्य झाल्याने जरांगे यांनी उपोषण सोडल्याची घोषणा केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज महत्त्वपूर्ण यश मिळाले. राज्य सरकारच्या मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली असून, राज्यपालांच्या सहीनंतर तत्काळ शासन निर्णय जारी केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाची लहर उसळली आहे.
मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेले उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होते. उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मी आता रुग्णालयात जाणार आहे असंही त्यांना सांगितलं. पाच दिवसांच्या या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत. उपोषण सोडल्यानंतर गणपतीची आरतीही करण्यात आली. तसेच मराठा आरक्षण उपसमितीनेही मराठा समाजाचे आभार मानले.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं. राज्य सरकारनं तसा GR देखील काढला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. त्याचबरोबर 'उपोषण सोडण्यासाठी या, तुमचं आमचं वैर संपलं'. ही घोषणा केल्यानंतर काही क्षणातच सरकारी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडलं.
आमचं म्हणणं एवढचं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित दादा आणि आमच्या मराठ्यांमध्ये एक कटुता आहे, ते जर इथं आले तर ती कटुता संपुष्टात येईल पण ते आले नाहीत तर ही कटुता कायम राहिल, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावले होते. मात्र, विखे पाटलांच्या विनंतीनंतर अखेर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
मंत्रिमंडळ समितीचा प्रमुख मलाच सर्व अधिकार देण्यात आले आहेत, त्यामुळे माझ्यासह मंत्रिमंडळातील सदस्यही आमच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार राधाकृष्ण विखे पाटील यांनाच दिले आहेत, त्यामुळे आपण उपोषण सोडावं अशी विनंती असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना विचारत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले. तसेच, दमानं गाड्या चालवा म्हणत मुंबईतून आता गावाकडं जायचंय, घरी निघायचं असे आवाहनही केले.