सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अन्यायाविरूध्द झुंज देणारे शूर स्वातंत्र्य योध्दे उमाजी नाईक यांची आज जयंती
  • आज चंद्रग्रहण
 राज्य

गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सदनात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

डिजिटल पुणे    03-09-2025 17:15:49

नवी दिल्ली :  गणेशोत्सवाचा उत्साह आणि आरोग्यसेवेचा संकल्प यांचा सुंदर ताळमेळ साधत, महाराष्ट्र सदनात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग येथे या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र सदन, वनराई फाऊंडेशन आणि महाराजा अग्रसेन हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना निवासी आयुक्त आर. विमला म्हणाल्या, “गणेशोत्सव हा आनंद आणि भक्तीचा सण आहे. या उत्सवाच्या निमित्ताने समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गणपती बाप्पा सर्वांना सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य देईल, हीच प्रार्थना आहे.” या शिबिराचा लाभ सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दिनांक ३ आणि ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जुने महाराष्ट्र सदन येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, तसेच सामान्य आरोग्य तपासणी यासारख्या विविध चाचण्या मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित असून, नागरिकांना आरोग्यविषयक सल्ला आणि मार्गदर्शनही केले जाणार आहे. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती