7 सप्टेंबर 2025, रविवारी खग्रास चंद्रग्रहण*
दिनांक 7 सप्टेंबर रोजी रविवारी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे.
*रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण सुरु होणार असून रात्री ११ वाजता खग्रास अवस्था सुरु होईल, या वेळेस पूर्ण चंद्रबिंब झाकले जाईल आणि रात्री १२ वाजून २३ मिनिटांनी पुन्हा चंद्रकोर दिसू लागेल. १ तास २३ मिनिटे खग्रास अवस्था राहणार आहे. उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी ग्रहण संपेल*
पूर्ण चंद्रबिंब दिसू लागेल. भारतासह संपूर्ण आशियाखंड, अफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे या प्रदेशात ग्रहण दिसेल.
हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरु होत असल्याने दुपारी १२:३७ पासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. *वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे* म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत, मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेणे हे करता येईल. लहान मुले, वृद्धवक्ती, आजारी - अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी 7 सप्टेंबरच्या संध्याकाळी ५:१५ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. ग्रहण पर्वकाळ म्हणजे *रात्री ९:५७ ते उत्तररात्री १:२७ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करु नयेत,* आधी करून घ्यावीत किंवा ग्रहण मोक्षानंतर करावीत.
ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, जेवण करू नये. महाराष्ट्रामध्ये काही प्रदेशात रविवारी देखील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु असतात अशा ठिकाणी रात्री ९ पूर्वी गणेशाचे विसर्जन करावे.
यापूर्वी 16 सप्टेंबर 1997 रोजी याप्रमाणे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलेले होते.