पुणे : पुण्यातील नानापेठ परिसरात टोळीयुद्धाने रणशिंग फुंकलं असून आंदेकर आणि कोमकर यांच्यातील वाद आणखी पेटला आहे. शुक्रवारी आंदेकरच्या टोळीने वनराज याच्या खुनाचा बदला घेतला अन् भाचा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता आयुष कोमकरचे वडील आणि वनराज आंदेकरचा आरोपी गणेश कोमकर आता नागपूरवरून पुण्याला रवाना झाले आहे. आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी तो पुण्यात पोहोचणार आहे.
आयुष कोमकरवर आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. वडील गणेश कोमकर पाच वाजता पुण्यात पोहोचणार आहे. नागपूरच्या जेलमधून त्याला पुण्याला विमानाने आणण्यात आलं आहे. आयुषच्या हत्येनंतर आता वैकुंठ स्मशानभूमीत त्याच्यावर चार दिवसानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत. आयुषचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता.
आयुषच्या अंत्यसंस्कारात कोणताही मोठा राडा होवू नये, यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा अंत्यसंस्कारावेळी असणार आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी खबरदारी घेतली असून कोणतीही चूक होणार नाही, याची खात्री पोलिसांनी घेतली आहे.
आयुष कोमकर हा 18 वर्षांचा असून तो महाविद्यालयात शिकत होता. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला आयुष कोमकर हा क्लासवरुन घरी आला. तो पार्किंगमध्ये गाडी लावत असताना यश पाटील याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आयुष कोमकरच्या शरीरात एकूण नऊ गोळ्या शिरल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच आयुष कोमकरचा मृत्यू झाला होता. यश पाटील आणि अमित पाटोळे यांनी घटनास्थळी दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला. आयुषवर गोळीबार करताना हे दोघे, 'इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असे ओरडत होते. या घटनेमुळे पुण्यातील टोळीयुद्ध आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या टोळीयुद्धाने पुण्यात मोठी दहशत पसरली आहे.